गिफ्ट ऑफ लॉकडाउन!

14 May 2020
covid

आज स्वतःला कोंडून घेऊन दोन महिने झाले!

दोन-तीन दिवसांपासून आरश्यात चेहेरा जरा छानच वाटतोय! घरी कामावर बायका येत नसल्याने व लहान दोन वर्षांची मुलगी असल्याने घरच्याघरी सुद्धा पार्लरला वेळ नाहीच मिळाला. तरीही माझ्या अचानकच तेजस्वी दिसणाऱ्या चेहऱ्यामागे काय रहस्य असेल? स्ट्रिक्ट लॉकडाउनमुळे रहदारी शून्यावर आली आहे, त्यामुळे प्रदूषण तर नाहीच! रात्रीच लख्ख चांदणे आणि शुद्ध झालेली हवा हे त्याची साक्ष आहेत. घरच्याघरीच दिवसभर असल्याने ऊन लागून काळवंडणे हे पण नगण्य. ह्या दोन गोष्टी वगळता अजून काय बर असेल?

फॅमिली एंटरटेनमेंटसाठी नवनवीन टास्क, आवडीचे पदार्थ बनवण्याची संधी, स्वतः सगळं हव तसं ऑर्गनाइज्ड ठेवायचा अट्टाहास, गाणी ऐकत भांडी घासणं, मुली बरोबर गमतीशीर वेळ, ती झोपली की उरल्या वेळात मास्क बनवणे, स्वतःचे हॉबी प्रोजेक्ट्स, डान्स क्लास, थोरामोठ्यांची जमेल तशी सेवा आणि हे सगळं सांभाळून वर्क फ्रॉम होम सुध्दा! हो थोड्याफार फरकाने पुष्कळ जणांच्या घरी हेच चालू आहे. दिवस कुठे उगवतो आणि कुठे मावळतो देवजाणे. कंबर मोडकळीस आली आहे. पण समाधान ही गोष्ट इतकी सुंदर आहे की ती चेहऱ्यावर दिसावी? नक्कीच असणार!

मला नवीन शिकायला खूप आवडत आणि क्रिएटीव्ह काम करणे त्याहूनच. ज्यात त्यात नको असताना आर्टिस्टिक इफेक्ट देणे माझा जिव्हाळ्याचा विषय राहिला. त्याबद्दल तारीफ पण घेतली मी खूप! तर अशा ह्या सर्जनशील मेंदू बद्दल मला एक गोष्ट उमजली आहे. जशी माणसाला उदर्भरणाची भूक असते आणि विद्वानांना ज्ञानाची तशी कलाकारांना कलेची वा कलाकृतीला जन्म देण्याची भूक असते. ही भूक रोज लागत नसली तरी असते. उदबत्तीचा सुगंधी धूर जशी हवेत सौन्दर्यवलये पटापट बखुबी बदलतो, तशी त्यांची प्रतिभा असते. असंख्य सुंदर कल्पना त्यांना तितक्याच वेगानी सुचतात. अश्या एखाद्या तरी कल्पनेला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांचा जीव धडपडतो. योग्य वेळ, योग्य साधने आणि उच्च कार्यशीलतेची संधी साधून तो त्या मायावी कलेच्या साधनेस बसतो. ही भूक भागली नाही आणि खूप दिवस वा महिने तशीच राहून गेली तर त्यास अस्वस्थता येते. त्याच्या मेंदूतल्या ह्या कोट्याला काहीतरी खाद्य पाहीजेच असते.

मला ह्यावेळेचा सदुपयोग करण्याची संधी मिळाली, पूर्णपणे नाही तरी काही अंशी मी ती साधून घेतली. ह्या एका कारणाने मला स्पिरिच्युअल समाधान मिळते. बाकी देवाची भक्त मी आहेच, परंतु कलेची आवड जोपासणे हाच मी माझ्या भक्तीचा मार्ग समजते. तुम्हाला पूजा-प्रवचने आवडत नसतील तर एखादी कला अंगीकारा. कलेचा आनंद घ्या. कलेला अभिप्राय द्या. कलाकारांना प्रोत्साहन द्या. जबाबदारीचे ओझं थोडावेळ खाली ठेवून कोणतीही कला पहिल्या वर्गातल्या मुलासारखी शिका. आणि आधीच कला असेल तर ती जोपासा. ह्या गोष्टी आत्म्याला निखळ आनंद देतात, चेहऱ्यावर त्या झळकतात! स्पिरिच्युआलीटीसाठी आपल्या देवाधिकांनी पण संगीत-वाद्य-नृत्याचा मार्ग दाखवलाच आहे! पण तुमची कला याहुनही वेगळी असूच शकते की.

मी तर गमक शोधले. पहा बरं तुमच्या परिचित व्यक्तीसुद्धा आजकाल जरा सतेजच वाटताहेत का?

comments powered by Disqus