तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी!

17 May 2020
covid social distancing health cleanliness

ऍक्टिवेट युअर एक्सट्रीम क्लीनलीनेस (सोवळे) प्रोटोकॉल!

आजकाल क्वचितच ऐकीवात येणाऱ्या धार्मिक कार्यांमध्ये पुष्कळदा पाळल्या जात असणाऱ्या स्वच्छतेला इतिहास आहे. त्या मागचे शास्त्रीय कारण शोधणाऱ्या मनाला कदाचित कालपर्यंत ते सगळ कालबाह्य वाटत असेलही. पण ज्या पूर्वजांनी आणि त्यांच्या पिढ्यांनी रोगराईच्या झळा सोसल्या त्यांनी स्वच्छतेचे कडक नियम केले असावेत का? अचानक नव्या रोगराईला तोंड द्यावे लागले तर “स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर” म्हणून किंवा रिस्कच नको म्हणून ते दैनंदिन जीवनात हे पाळले का? आपल्याला माहित नाही. परंतु सुदैवाने तो प्रोटोकॉल आपल्याकडे आहे. ते पाळणारे लोकही आहेत. आपल्याला आज त्याच्याबद्दल जाणून घेण्याची गरज आहे.

सोवळे कसे पाळतात

 1. आपले कपडे स्वतः धुवून दोरीवर वाळत घालणे. सफाईमदतनीसानी धुतले असल्यास त्यावर पुन्हा पाणी टाकणे व मगच वाळत घालणे.
 2. वाळलेल्या कपड्यांना स्वच्छ अंघोळ करूनच स्पर्श करणे व मग ते परीधान करणे.
 3. आता हे धूत वस्त्र नेसल्यानंतर कोणात्याही व्यक्तीला कशाही प्रकारे न शिवणे.
 4. स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करणे. सफाईमदतनीसानी स्वच्छ केलेली भांडी पुन्हा पाणी टाकून स्वच्छ करून घेणे.
 5. शिळे अन्न व ताजे अन्न एकत्र न ठेवणे. दुधावरची साय फुंकर न मारता चमच्याने बाजूला करणे. उष्टे अन्न न खाणे. उष्टी वा खरकटी भांडी धुवूनच वापरणे.
 6. स्वयंपाक होईपर्यंत ही स्वच्छता पाळणे.

या वरून असे दिसत आहे की घरातल्या घरातही social distancing काही वेळा पुरते का होईना, स्वयंपाकासारख्या महत्वाच्या गोष्टीसाठी पाळले गेले. या शिवाय ते पूजा अर्चा करतानाही वापरले जात. प्रसाद भोजन वाढणे पूर्ण होई पर्यंत सुद्धा हे पाळले जात असत.

ही स्वच्छता योग्यच! ह्या प्रोटोकॉलची सुधारित आवृत्ती येण्याची गरज आहे. समाजातल्या ठराविक कार्यक्रमांचे पावित्र्य राखणारी आणि खूप मोजक्या लोकांनी जपून ठेवलेली ही परंपरा आज आपली आवश्यक जीवन पद्धती बनू पाहत आहे. मानवतेच्या कल्याणासाठी ही एक उपयुक्त गोष्ट ठरेल.

प्रोटोकॉल अपडेट

२०२० साठी आधुनिक सोवळे! घरातल्या घरात लागण न पसरण्यासाठी हे पाळणे नक्कीच कठीण नाही.

 1. अंघोळी नंतर स्वयंपाक करणे. स्वयंपाकापूर्वी व नंतर हात धुणे. फळ भाज्या साल धुवून साल काढूनच खाणे. शक्यतो शिजवलेले अन्न खाणे. अन्न पदार्थांचे वास न घेणे. फिल्टरचे वा उकळलेले पाणी पिणे. स्वयंपाकास, तोंड धुताना किंवा चुळ भरताना हेच पाणी वापरणे.
 2. स्वतःची उष्टी भांडी स्वतः साबणानेच घासणे जसे की ताट, वाटी, पेला, चमचा आणि चहाचा कप. दुसऱ्या व्यक्तीने त्या भांड्यांना स्पर्श न करणे.
 3. प्रत्येकाचा पाण्याचा पेला वेगळया डिझाईनचा अथवा नैलपॉलिशनी खूण केलेला. कमी भांडी घासावी लागतील आणि मिक्स होणार नाहीत. कोणाच्या ताटातले उष्टे न खाणे, स्वतःचे ही त्याला चालते म्हणून न देणे.
 4. बेसिन आणि ओटा काम झाले की साफ करणे. पिण्याचे वापरले पेले व न वापरलेले पेले खुणेने ठेवणे. तत्परतेने घासून टाकणे.
 5. घरातल्या घरातही सदस्यापासून दोन हातांचे अंतर पाळणे. स्वतःच्या तसेच दुसऱ्याच्या तोंडाला मायेसाठी म्हणूनसुद्धा हात न लावणे. लहान मुलांना काळजी देण्यापूर्वी आणि देऊन झाल्यावर हात साबणाने धुणे.
 6. आपली ज्ञानेंद्रिये अत्यंत महत्वाची आहेत त्याच्या सुरक्षा कायम ठेवणे. बाहेर पडताना सुरक्षा कवचे परिधान करणे. बाहेरून परिधान करून आलेले कपडे तसेच आणलेले सामान स्वच्छ व निर्जंतुक करून घेणे.
 7. सारख्या वापरात येणाऱ्या आणि सर्वजण वापरात असेल्या गोष्टी सतत पुसून स्वच्छ ठेवणे. झाडून काढणे, धूळ पुसणे, जुनी खूप दिवस न उघडलेली कपाटे, माळे उघडणे, धूळ बसलेली कागदपत्रे चाळणे इत्यादी गोष्टींचे काम घरच्या घरी करतानाही मास्कचा वापर करणे. कारण धुळीची allergy टाळता येते आणि त्यामुळे लागणारे औषध उपचार, बाहेर पडणे, आणि कोरोनाची शंका करण्याचे कारण राहत नाही.
 8. सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण, स्वावलंबी होणे. आत्मनिर्भर होणे. समग्र काटेकोर स्वच्छता पाळणे. नवीन नियमावलीं बाबत सदैव जागरुक राहणे. कोणतीही तडजोड न करणे, टाळाटाळ न करणे.

नुकतेच प्रकाशित झालेल्या विदेशी लेखात जे वाचले गेले त्यासाठी एकच म्हण मराठीत आहे. ती म्हणजे “बाहेर गेलात तर कोणाच्या वाऱ्यालाही थांबू नका”. वर्ल्ड हेल्द ऑर्गनाईझेशनच्या (WHO) आणि तत्सम गाईडलाईन बद्दल आपण पुष्कळ जागरूक आहोतच. हस्तांदोलनापेक्षा हात जोडून केलेले अभिवादन जर श्रेयस्कर ठरत असेल तर आपल्याच संस्कृतीतल्या गाईडलाईन कोणी आपल्यालाच ‘बरोबर आहेत’ हे शिक्कामोर्तब करण्याची गरज आहे का? जागतिक संकट आपल्याही उंबऱ्यावर उभे असताना परंपरांकडे पुन्हा वळण्याची वेळ आली आहे. रामायणामध्ये हनुमानाला जांबुवंताने त्याच्या अफाट शक्तीची जाणीव करून दिली होती. तशीच आपल्यालाही आपल्या संस्कृती बद्द्ल व्हावी.

ॐ सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥

सोवळे माहिती सौजन्य -

 • श्रीमती कृष्णाबाई परळीकर
 • सौ. पूजा शिरसीकर
comments powered by Disqus